जाधववाडी येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध विकास कामांचे लोकार्पण ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घाई गर्दीत करण्यात आले. महिना उलटत नाही तोच हरिभाऊ किसनराव बागडे शेतकरी बाजार संकुलाचे छत गळू लागले आहे. तर शेडचीही पडझड झाली आहे. त्यामुळे संकुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरून करण्यात आले आहे.
येथे जर एखादी दूर्घटना झाली तरी तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बाजार समितीतील निकृष्ट कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी आणि शेतकर्यांनी केली आहे. या प्रकरणी बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते कार्यक्रमात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. मराठवाड्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून औरंगाबादच्या बाजार समितीची ओळख आहे. दररोज समितीमध्ये शेतकर्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालाची उलाढाल या समितीत होत असते. बाजार समितीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून शेतकर्यांच्या सुविधेसाठी एक हजार मेट्रीक टन क्षमतेचे दोन गोदाम बांधण्यात आले. शेती नियमित माल वाळविण्यासाठी मका संकलन केंद्र, फुल मार्केट, फळे, भाजीपाला मार्केटमध्ये काँक्रिट रस्ते, माल वाळविण्यासाठी शेड उभारण्यात आले. या कामांपैकी काही कामे अर्धवट स्थितीत असतानाच ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्त यासर्व कामांचे लोकार्पण घाईघाईत उरकून घेण्यात आले. बाजार समितीत जे काँक्रिट रस्ते करण्यात आले त्यासही तडे गेले आहेत. यासर्व कामांसाठी वापरण्यात आलेल्या विटा या निकृष्ट दर्जाच्या आहेत. तसेच बांधकामासाठी वापरण्यात आलेली वाळू ही माती मिश्रित आहे. सिमेंटचा वापरही अल्प प्रमाणात करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने बांधलेल्या संकुलाच्या पडझडीला सुरुवात झाली आहे. बाजार समितीत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ किसनराव बागडे यांच्या नावाने संकुल उभारण्यात आले आहे. पत्र्याच्या दोन शेडमध्ये स्लॅब टाकून मोठे शेड तयार करण्यात आले आहे. उद्घाटनासाठी घाईघाईने स्लॅब टाकण्यात आला होता. मजबुतीकरणासाठी त्यावर पाणी टाकण्यात आले असता स्लॅब गळू लागला आहे. सध्या हिवाळा असताना त्यावर टाकलेल्या पाण्याने स्लॅब गळत असेल तर पावसाळ्यात त्याचे काय हाल होतील याचा विचार न केलेलाच बरा, असे शेतकर्यांमध्ये व व्यापार्यांमध्ये बोलले जात आहे.
बागडे नानाच्या नावाला महत्त्व
विधानसभेचे अध्यक्ष तथा स्थानिक आमदार हरिभाऊ बागडे यांचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात आदराने घेतले जाते. त्यांच्या ५० वर्षांच्या राजकारणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. सध्या बाजार समिती ही भाजपाच्या ताब्यात आहे. त्यामुळे समितीच्या संचालकांनी जाधववाडीत बांधलेल्या संकुलाला हरिभाऊ किसनराव बागडे शेतकरी बाजार समिती असे नाव दिले आहे. पण संकुलाच्या स्लॅबलाच गळती लागली आहे. तसेच पडझड झालेली आहे. त्यामुळे संकुलाचे काम निकृष्ट झाले असल्याचे दिसते. त्यामुळे आता बागडे नानांनीच या कामाची चौकशी करावी, असे बोलले जात आहे.